वर्धा - शहरात मागील काही दिवसांपासून नदीवरील पुलाला चरख्याची प्रतिकृती असलेले फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. नागपूर ते मुंबई प्रवासाचे तास कमी करणारा समृद्धी महामार्गावर हा पूल बांधला जाणार असल्याचीही चर्चा होत होती. महात्मा गांधी आणि त्यांच्या चरख्याने वर्ध्याला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. त्यामुळे चरख्याची प्रतिकृती असलेल्या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. नेमका हा पूल कुठे आणि कसा बांधला जाणार आहे, पाहुयात या खास रिपोर्टमधून...
गांधींच्या कर्मभूमीचा इतिहास समृद्ध करणाऱ्या 'चरख्या'ची प्रतिकृती असणारा पूल - महात्मा गांधी वर्धा
वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला आहे. यामुळे जागतिक पातळीवर याला ओळख मिळालेली आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर वर्धा जिल्ह्यात गांधीजींच्या चरख्याची प्रतिकृती असलेल्या पुलाची निर्मिती केली जाणार आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे करण्यात आलेले आहे. या मार्गामुळे नागपूर ते मुंबई 700 किलोमीटरचे अंतर 14 तासांऐवजी केवळ 8 तासावर येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या महामार्गाचे काम होणार आहे. चरख्याची प्रतिकृती असलेला हा पूल वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच वर्धा नदीला जोडण्याचे काम करणार आहे. यामध्ये चरख्याचे दोन मोठे गोल रिंग (40 मीटर) असतील आणि मध्ये एक रिंग (16 मीटर) असल्याची माहिती आहे. ही रिंग म्हणजेच चरख्याची प्रतिकृती असणार असून, ती दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असणार आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या प्रवाशांचे लक्ष याकडे वेधले जाईल. नागपूर-मुंबई महामार्गावर असे एकूण 32 पूल बांधले जाणार आहेत. यात गांधी जिल्ह्याची ओळख म्हणून चरख्याची प्रतिकृती असणार आहे. सोबतच वर्ध्यासह नागपूर, बुलढाणा, नाशिक आणि ठाणे असे पाच जिल्ह्याची ओळख दर्शवण्याऱ्या वेगवेगळ्या प्रतिकृती देखील असणार आहेत. यात नागपूर जिल्ह्याची ओळख 'वाघ वाचवा' अशी राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा हा कमी अंतराचा प्रवास आणखी खास ठरणार आहे.