वर्धा- हिंगणघाट वडनेर येथील शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या वडनेर शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जमाफी मिळूनही बँकेने कर्जमाफी न दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी मंत्रालयातुन चौकशीचे आदेश आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली होती.
गणपत भोरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर गौतम जांभुळे असे गुन्हा दाखल झालेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वाधिक शाखा असल्याने बँक ऑफ इंडिया जिल्ह्याची लीड बँक आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकाऱयांनी चौकशी केली.
भोरे यांनी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी विष पिऊन करून आत्महत्या केली होती. साडेचार एकर शेती, पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा त्यांचे कुटुंब होते. मागील वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. त्यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे, ग्रामशक्ती या खासगी फायनान्स कंपनीच तीन लाख रुपये तसेच इतरांचे दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. याच विवंचनेतून आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे.