वर्धा : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा तालुक्यातील ठाणेगावजवळ एका चारचाकीने पायी जाणाऱ्या महिलांना जबर धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतावरील काम संपवून घरी जात असताना या महिलांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. भाग्यरथी चंपक धुर्वे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर चालक आणि त्यात बसलेल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे सांगितले जात आहे.
शेतातली कामे आटोपून सायंकाळी ३ शेतमजूर महिला घरी जात होत्या. यावेळी नागपूरकडून अमरावतीला भरधाव जाणाऱ्या चारचाकीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला चालणाऱ्या महिलांना चारचाकीने धडक दिली. यामध्ये कार (एमएच २७, व्हीबी ८८५५) ची जोरदार धडक बसल्याने भाग्यरथी धुर्वे या शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, सोबतच्या सरस्वती गणपत दूधकवळे आणि शालिनी सुनील येडमे (दोघीही राहणार ठाणेगाव) या दोघी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.