वर्धा- सामाजिक संघटनांनी आज एकत्र येत हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेध केला. शहरातील दोन वेग-वेगळ्या ठिकाणाहून कँडल मार्चला सुरुवात झाली. तर शिवाजी चौकात एकत्र येत डॉक्टर तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
चारुलता टोकस, महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आरोपींना भर रस्त्यावर शिक्षा देणे गरजेचे आहे. शिवाय कायद्यात बदल करण्याची मागणी यावेळी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केली. या घटना पाहता आरोपींच्या मनात भीती निर्माण व्हावी, अशी शिक्षा जोपर्यंत दिली जाणार नाही, तोपर्यंत हे कृत्य करणाऱ्यांमध्ये भीती जरब बसणार नाही, असेही टोकस यांनी सांगितले.
हेही वाचा -विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात वर्धा नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन
नेहमी मुलींना संस्कार दिले जावेत, असे बोलले जाते. मात्र, मुलेच लहान वयात चुकीच्या मार्गाने भटकू लागली आहेत. त्यांच्यावर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे, असे मत एका मुलीची आई या नात्याने मनीषा मेघे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - वैद्यकीय अधिकार्याअभावी रुग्णवाहिकेला ब्रेक; कंत्राटी कंपनीचे दुर्लक्ष
या कँडल मार्चमध्ये नर्सिंग ट्रेनिंग स्कूल, नर्सिंग स्टाफ व विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ, पणती महिला संघ, नर्सिंग स्कूल असोसिएशन, वर्धा सोशल फोरम, फूटपाथ स्कूल, सह्याद्री फौंडेशन, सैनिक संघटना तसेच यासाठी डॉ. शिल्पा सातव, मनीषा मेघे, डॉ.अभ्युदय मेघे, मोहित सहारे, अनिकेत भोयर, चेतन काळे, विशाल उराडे, इंदू अलवडकर, अख्तर शेख, अमोल बालपांडे, दक्षता ढोके, हेमा शिंदे, शाम परसोडकर आदींनी प्रयत्न करत मार्च काढला.