वर्धा -प्रेयसीकडून वारंवार मिळत असलेल्या धमकीने हताश होऊन तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्याच्या मांडला शिवारात घडला. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. मृतक तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृतकाचे नाव आशिष भोपळे असे आहे. ( boyfriend commits suicide due to girlfriend harassment )
प्रेयसी देत होती धमकी - मृतक आशिष भोपळे याचे प्रेयसी राणी (नाव बदलेले) या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, राणी ही तिचा मित्र तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास देत होती. तुझे लग्न कसे होते अशी धमकी देत वारंवार पैशाची मागणी करत होती. यात नुकतेच काही दिवसांपूर्वी आशिषला तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना ठार मारुन तुला पोलीस केसमध्ये फसवणार अशी धमकी दिली. याच बदनामी आणि भीतीमुळे आशिष भोपळे याने सावंगी पोलीस स्टेशच्या हद्दीतील मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
1 जून रोजी गुन्हा दाखल - मृतक आशिष हा 21 मे रोजी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर 26 मे रोजी त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यावेळी त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली होती. त्यावरून 1 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.