वर्धा: राजेश डफर हे वर्धा जिल्ह्यातील मात्र जळगाव येथे राहणारे युवा शेतकरी आहे. त्यांना आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करायला आवडतात आणि त्याचाच वसा घेत त्यांनी या काळ्या गव्हाला शोधून काढत त्याची लागवड शेतात केली. मोठ्या प्रमाणात पीक घेऊन त्यांची विक्रीही आता जोरदार सुरू आहे. लोकांना त्याचे फायदे समजल्यावर नागरिक स्वतः ते गहू घेण्यासाठी दुरदुरून येत असतात. पुष्कळ ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्यांना आकोट येथे हे बियाणे मिळाले. त्यांनी प्रारंभिक 40 किलो गहू आणून ते एक एकरमध्ये पेरले. आश्चर्य म्हणजे एक एकरात त्यांना 18 क्विंंटल काळ्या गव्हाचे उत्पादन झाले.
काळ्या गव्हाची वैशिष्ट्ये:काळा गहू हा कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींवर प्रभावी गुण देणारा आहे. या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, 'बी' जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण आणि पोषकमूल्य जास्त प्रमाणात असते. शास्त्रज्ञांच्या माहितीप्रमाणे याला आपण समृद्ध, पौष्टिक आणि सकस आहारदेखील म्हणू शकतो. या गव्हात अॅन्थोसायनीनचे प्रमाण १४० पीपीएम असल्याने हा गहू काळा दिसतो.