वर्धा- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सध्या सोयाबीन पीक शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र,सोयबीनला एकही शेंग आलेली नाही. ही परिस्थिती आमदार समीर कुणावर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमोर मांडली. यावेळी कृषी मंत्र्याना शेंगा नसलेली सोयाबीन दाखवण्यात आली आहे. आमदार कुणावर यांनी सरकारडून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत केली जावी, अशी मागणी करण्यात आली. कृषी मंत्री दादाजी भुसे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीसाठी ते आले होते.
जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीन पीक खराब झाले आहे. झाडाला शेंगा नसल्याने शेतकऱ्यांना यापासून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे समीर कुणावर यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यामधील हजारो हेक्टर पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. मागील 15 वर्षात असे पूर्ण पीक हातून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही.