वर्धा -जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठीही आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सज्ज आहे. यासाठी येथे ३० खाटांचा विशेष वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या सावंगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे २४ रुग्ण भरती असून आतापर्यंत १२ शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू तथा ज्येष्ठ मुखशल्यचिकित्सक डॉ. राजीव बोरले यांनी ही माहिती दिली.
कोरोनाबाधित रुग्णांनी मातीचा किंवा धुळीचा संपर्क टाळवा -
हा आजार शरीरात विविध मार्गाने प्रवेश करीत असला तरी प्रामुख्याने श्वसनमार्गाने या आजाराच्या विषाणूंचा संसर्ग वाढतो आहे. साधारणतः नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक आणि डोळ्यांना कमकुवत करणारा आहे. यामुळे कोरोनाबाधित मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे नितांत गरजेचे आहे. मातीचा किंवा धुळीचा संपर्कही रुग्णांनी टाळला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यास ठरते घातक -
म्युकरमायकोसिस हा प्राणघातक बुरशीजन्य आजार ब्लॅक फंगल इन्फेक्शन म्हणूनही पूर्वीपासून वैद्यकीय क्षेत्राला परिचित आहे. मधुमेही, हृदयरुग्ण, कर्करोगग्रस्त, मूत्रपिंडविकार असलेले किंवा एचआयव्हीबाधित रुग्णांना कमीअधिक प्रमाणात बाधक ठरणारा हा दुर्मिळ आजार आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी नव्याने त्रासदायक ठरला आहे. विशेषतः रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरलेल्या या आजाराने कोरोना काळातील आरोग्य सेवेपुढेही एक नवे आव्हान उभे केले आहे.