वर्धा - सेवाग्राम नंतर सेलूमध्ये पुन्हा एटीएम मशीन चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन पळवून साडे सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
सेवाग्रामनंतर सेलूमध्ये चोरट्टयांचा एटीएमवर डल्ला;साडे सात लाखांचा मुद्देमाल लंपास सेलू येथील यशवंत चौकातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे अत्यंत शिताफीने पळवले. विशेष म्हणजे हे एटीएम पोलीस स्टेशनपासून अवघे 300 मीटर दूर आहे. सुरवातीला एका माणसाने तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये प्रवेश केला. चोरीचे दृश्य रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून त्याने कॅमेराची दिशा बदलवली. तसेच सायरन वाजू नये म्हणून वायरही कापून टाकली. त्यामुळे एटीएम मशीन 3.29 मिनीटांनी सर्व्हरच्या यंत्रणेपासून तुटली. त्यांनतर ही मशीन वाहनात टाकून पळवली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एटीएम चालवण्याची जबाबदारी इपीएस सिस्टीमकडे कंपनीकडे आहे. त्या कंपनीचे अमोल तिघरे यांनी चोरीच्या घटनेची तक्रार केली आहेत. या घटनेत एटीएम मशीनमधील सहा लाख 94 हजार रुपयांची रक्कम तसेच एटीएम मशीन असा एकूण सात लाख 44 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
दरम्यान, अप्पर पोलीस निलेश मोरे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्माने, सेलू पोलीस निरीक्षक सुनील गाढे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. एक जानेवारीला सेवाग्राममध्येही अशाच पध्दतीने चोरट्यांनी एटीएम पळवले होते. या घटनेत 13 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. मात्र, यावेळी साडे सात लाखांची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. त्यामुळे या दोन्ही घटना लक्षात घेता या घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'निर्भया प्रकरणी दोषींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण व्हावे'