वर्धा :96 व्याअखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आज वर्ध्यात समारोप झाला. यावेळी समारोप कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, वर्ध्याच्या ऐतिहासिक भूमीवर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकांना विचारांचे अमृत मिळाले आहे. हे विचार समाजाला नवी दिशा नक्की देतील.
10 कोटींचा निधी जाहीर : वर्ध्यातील साहीत्य संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ साहित्य संघाला शताब्दी वर्षात १० कोटी निधी जाहीर केला. याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की, कोणत्याही भाषेचे संगोपन होण्यासाठी तिचा वापर ज्ञानार्जनासाठी होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि ज्ञानावर आधारीत सर्व क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी, मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. विदर्भ साहित्य संघाला शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांनी यावेळी 10 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.
मराठी ज्ञानभाषा होईल - फडवणीस : मराठी सारस्वतांच्या उपस्थितीत वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. समारोपीय दिवसाच्या शुभारंभ सत्रात आपल्या शुभेच्छा संदेशांमध्ये त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याच्या पुनरुच्चार केला. गेल्या काही वर्षामध्ये भाषा संवर्धनात आलेला ऱ्हास भरून निघेल. आता केंद्र शासनाने नवीन शिक्षण निती तयार केली असून इंग्रजीऐवजी आता मराठी भाषेत सर्व ज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार केले जातील. मराठी आता व्यवहारातील ज्ञानभाषा होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केले. यावेळी मेघे इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याचा ब्लू प्रिंट तयारी करणारी भूमी : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत होत असलेल्या आयोजनाचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा लढा असो, भूदान चळवळ असो, शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम या भूमीतूनच झाले आहे. संपूर्ण स्वराज्याची मागणी येथे झाली होती. रामराज्य, सुराज्याच्या शाश्वत विचारांचा संदेश याच भूमीतून दिला गेला. त्यामुळे साहित्य संमेलन येथे होणे अतिशय औचित्यपूर्ण आहे. थोडक्यात स्वातंत्र्याची 'ब्ल्यू प्रिंट' तयार करणारी ही भूमी आहे.
समाजाला नवी दिशा देणारे विचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
वर्धा हीराष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबा, जमनालाल बजाज, सिंधूताई सपकाळ, पांडूरंगजी खानखोजे यांची पवित्रभूमी आहे. वर्ध्याच्या ऐतिहासिक भूमीवर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकांना विचारांचे अमृत मिळाले आहे. हे विचार समाजाला नवी दिशा नक्की देतील, असे विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. आचार्य विनोबा भावे सभामंडपात झालेल्या या समारोप कार्यक्रम आणि खुल्या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती लाभली.
साहित्य संमेलन यशस्वी : संत वाडमयाचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी यांनी विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष स्व. मनोहर म्हैसाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्वांच्या सहभागामुळे हे संमेलन यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, साहित्य, संस्कृतीतून समाज बदलत असतो, घडत असतो. भविष्यातील समाजाची दिशा ही साहित्यातून प्रतिबिंबित होत असते. राष्ट्रीय व सामाजिक जीवनात शिक्षण, आरोग्य, उद्योग, विकास क्षेत्र महत्वाचे असते तसे साहित्याचे क्षेत्रही महत्वाचे असते.
नव्या प्रतिभांचा हुंकार - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, अरविंद जगताप, किशोर कदम ‘सौमित्र’ ही कलावंत मंडळी साहित्य संमेलनात आली. त्यांच्यानिमित्ताने नव्या प्रतिभेचे हुंकार साहित्य संमेलनता येत आहे, त्यांचे स्वागत केले पाहिजे, असे संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले. सांहित्य संमेलने जितक्या कमी खर्चामध्ये करता येतील तेवढी ती केली पाहिजे. एकमेकांना भेटण्याची, विचारांचे आदानप्रदान करण्याची संधी त्यामुळे प्राप्त होते, असे ते म्हणाले. मतभेद असतील तरी साहित्याचा विचारांचे आदानप्रदान होत नाही. त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट दिली. सर्वांनी अशी उदारता शिकली पाहिजे. चांगली मासिके, नियतकालिक ही उदारता शिकवतात, असे ते म्हणाले.
मान्यवरांची उपस्थिती : सुरुवातीस संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदिप दाते यांनी प्रास्ताविक केले. संमेलन गिताचे सादरीकरण देखील झाले. यावेळी उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या 'वरदा' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर केंद्र शासनाच्या भारतीय संस्कृती संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, महामंडळाचे कार्यवाह उज्वला मेहेंदळे, खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, आमदार समीर मेघे, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सागर मेघे व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :CM Shinde In Vidriohi Sahitya Sammelan : विद्रोही साहित्य संमेलनात अवतरले एकनाथ शिंदे; '५० खोके एकदम ओक्के'च्या दिल्या घोषणा