वर्धा - नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एटीएम मशीन चोरीला गेल्याची घटना ताजी आहे. असे असताना आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. आर्वी तालुक्याच्या खरांगणा (मोरांगणा) ते कोंढाळी मार्गावरील ढगा शिवारात एटीएम मशीन फेकलेल्या अवस्थेत आढळले. मात्र, हे मशिन नेमके कोणत्या एटीएमचे आहे याचा शोध अजून लागला नाही.
ढगा फाट्यावरील रस्त्यालगतच्या गड्ड्यात एटीएम मशीन फेकलेली असल्याचे आढळून आले. हा भाग रस्त्यापासून बराच आतमध्ये आहे. याची माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच, घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. खरांगणा ते कोंढाळी मार्गावर ढगा (भूवन) पाटीजवळ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचार्यांसह मशिन जप्त केली. यावेळी वनविभागाचे मासोद येथील सहवनक्षेत्र अधिकारी प्रवीण डेहनकर, चव्हाण आदी उपस्थित होते.
हेही वाचा -डॉ. रुपा कुलकर्णी : असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी सावित्रीची लेक
ढगा फाट्यावर मिळालेले एटीएम मशीन एनसीआर कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात ही कंपनी नेमकी कोणत्या बँकेला मशीन पुरवतात, याचा तपास करावा लागणार आहे. वर्धा आणि नागपूर येथे आधीही एटीएम मशीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. हे मशीन त्या चोरी केलेल्या मशिनींपैकी नसल्याचे खरंगण्याचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी सांगितले.