वर्धा - सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असतांना वर्ध्यात कंपनी चालक मनमानी करताना दिसून आले. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत त्यांना केराची टोपली दाखवण्याचे काम केले जात होते. यावर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी उत्तम गॅलवा स्टील कंपनीला 5 लाखांचा दंड करत काम बंद केले. यानंतरही देवळी एमआयडीसीतील महालक्ष्मी स्टील कंपनीत सुद्धा हाच प्रकार उघडकीस आल्याने 35 हजाराचा दंड ठोठावत कारवाई करण्यात आली.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत विविध कारणे देत कंपनीचे काम सुरू ठेवण्यात आले होते. यावर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी काही एसओपीचे पालन करण्याच्या सूचना दिल्यात. कर्मचाऱ्यांची कपात करत काम करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय कंपनीच्या आतमधील परिसरात राहणाऱ्या कामगारांना बोलावत हळुहळु मशनिरी बंद करत काही कालावधीत पूर्ण काम बंद करण्याचे आदेश दिले. यासह सोशल डिस्टनसिंग पाळत स्वछता ठेवण्याचे आदेश सुद्धा दिलेत.
पण, प्रत्यक्षात सेलू काटे येथील उत्तम गलवा आणि त्यांनंतर आता महालक्ष्मी स्टील या दोन्ही कंपन्यांनी नियमांचे पालन न करता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ चालवला. यामुळे प्रत्यक्ष पाहणीत नियमांचा भंग केल्याने पहिल्यांदा या कंपनीला 5 लाखाचा दंड ठोठावत काम बंद करण्याचे आदेश दिले.