वर्धा - जिल्ह्यातील गिरड येथे असलेल्या प्रसिद्ध बुवा फरीद दर्ग्यातून दर्शन केल्यानंतर नागपूरला निघालेल्या ऑटोला उमेरड जवळ भीषण अपघात झाला. भरधाव टिप्पर आणि ऑटो मध्ये धकड झाल्याने हा अपघात घडला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उमरेड येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या धुरखेड शिवारात घडली आहे.
मृतांमध्ये ऑटो चालक मोहम्मद सकीर शेख अब्दुल कादिर (वय-४२), अब्दुल कादिर अब्दुल करीम (वय-५५) आणि जुबिया अली इम्रान अली यांचा समावेश आहे. याशिवाय चार प्रवासी जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी हे सर्व नागपूरच्या शांतीनगर येथील रहिवासी आहेत. स्थानिकांच्या मते ऑटो गिरड येथून उमरेड मार्गे नागपूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर ने ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक प्रवाशाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी टिप्पर चालकाला अटक केली आहे. ऑटोला धकड दिल्यानंतर टिप्पर शेजारी असलेल्या हॉटेल मध्ये घुसला. मात्र, त्याठिकाणी कुणीही नव्हते.