वर्धा - कारागृहात कैद्याचे जीवन जगण्याच्या नैराश्यातून एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपीच्या मृत्यूच्या घटनेने कारागृहातील सकाळ धक्कादायक झाली. आजन्म कारावासाची शिक्षा भोगताना राहत असलेल्या बराकीतील खिडकीला दुपट्टा बांधून गळफास घेत या कैद्याने आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील गोपीचंद रामचंद्र डहाके (वय 38) असे मृतक कैद्याचे नाव आहे.
गोपीचंद हा वर्धा जिल्ह्यातील कारागृहात मागील दोन वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनतर अमरावती येथून वर्ध्याच्या कारागृहात त्याला आणण्यात आले. त्याला खूनाचा गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील विडुरचा रहिवासी होता. त्याला संचित रजेवर सोडण्यात आले. पण त्याचा संचित रजेचा कालावधी संपूनसुद्धा तो कारागृहात परतला नव्हता. यामुळे त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली होती. तर, पुढील काळात संचित रजा नियमानुसार अटींचे पालन न केल्याने मिळणार नव्हती. यामुळे तो नैराश्यात होता. मागील काही दिवसांपासून तो नैराश्यात राहत असल्याचेसुद्धा पुढे आले आहे.