वर्धा- हिंगणघाट येथील वर्धमान टेक्स्टाईल कापडाच्या दुकानाला आज पहाटे आग लागल्याने खळबळ उडाली. यात अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवताना सिलेंडरचा स्फोट झाला. यात सहा जण जखमी झाले. जखमीमध्ये अग्निशामक दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे. खाली कापड दुकान आणि वर घर असल्याने कुटुंबातील अनेकांनी पहिल्या माळ्यावरून बाल्कनीच्या बाहेर टिनाच्या शेडवर उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. यात कुटुंब गाढ झोपेत असताना तीन वाजताच्या सुमारास आग लागली. शेजाऱ्यांना आग दिसताच त्यांनी अग्निशामकला बोलावले. त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यावेळी आगीने रौद्ररूप धारण केले होते. यात घरातील तापमान प्रचंड वाढल्याने आग विझवताना सिलेंडरचा स्फोट झाला. यात अग्निशामक दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले.