वर्धा- वर्ध्यात कोरोनाबाधित पोलीस हवालदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय निधीतून ५० लाख रुपयांचा धनादेश पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
प्रकृती बिघडल्याने पोलीस हवालदाराला २ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे, त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कोरोना काळात कर्तव्यावर असताना पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय आहे. याप्रकरणात पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात पाठपुरावा करत कुटुंबीयांना एक महिन्याच्या आत ५० लाखाचा धनादेश मिळवून दिला.