वर्धा -जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या शिवीगाळ प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक कारावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. मात्र या पत्रकार परिषदेमुळे आपत्ती व्यवस्थापण कायद्याचे उल्लंघन झाल्याने खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावबंदी असताना पत्रकार परिषद घेतल्याने खासदार तडस आणि आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तडस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी देखील अनेक पत्रकार परिषद झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार परिषद घेतात मग त्यांच्यावर का गुन्हा दाखल होत नाही? असा सवाल तडस यांनी उपस्थित केला आहे. प्रशासन आणि पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला का याची देखील चौकशी झाली पाहिजे, असंही यावेळी तडस यांनी म्हटले आहे.