महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sahitya Sammelan 2023 : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात; वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होत आहे. ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, यंदाच्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्यासह शेकडो साहित्यिक आणि साहित्य रसिक उपस्थित होते. लहान मुलामुलींनी लेझीम आणि संगीताच्या तालावर ठेका धरल्याचंही पहायला मिळाले. यावेळी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करण्यात आली होती.

By

Published : Feb 3, 2023, 11:30 AM IST

Updated : Feb 3, 2023, 3:04 PM IST

Sahitya Sammelan 2023
ग्रंथ दिंडीने भारतीय साहित्य संमेलनाला सुरूवात

ग्रंथ दिंडीने भारतीय साहित्य संमेलनाला सुरूवात

वर्धा : शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद सिरसाट व विवेक सावंत यांनी घेतली. याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता प्रसिद्ध मराठी सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे व कवी 'सौमित्र' किशोर कदम यांचा सहभाग असलेला 'मुक्त संवाद' हा कार्यक्रम होणार आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले हे अध्यक्षस्थानी राहणार असून संवादक बालाजी सुतार राहतील.

वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी - साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात विदर्भ राज्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन जणांनी घोषणाबाजी केली. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


परिसंवाद आणि परिचर्चा :या संमेलनात मनोहर म्हैसाळकर सभामंडप व आचार्य विनोबा भावे सभामंडपामध्ये तीन दिवस एकूण तेरा विषयांवर परिसंवाद होणार आहे. त्यात कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेत्तर साहित्याची वाढती लोकप्रियता, विदर्भातील बोलीभाषा, भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, वैदर्भीय वाडमयीन परंपरा, गांधीजी ते विनोबाजी:वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून, वाचन पर्यायाच्या पसाऱ्यात गोंधळलेले वाचक, वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष तुलना (ताराबाई शिंदे) विषयावर परिचर्चा होणार आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण व त्यावर चर्चादेखील होईल.


कवितेचा जागर व इतर कार्यक्रम :निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन 3 तारखेला रात्री 8.30 जयराम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. रात्री 8 वाजता 'मृद्गंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा' हा विदर्भ साहित्य संघाची प्रस्तुती असलेला कार्यक्रम होणार आहे. दुसरे कविसंमेलन 4 तारखेला रात्री 8.30 वाजता श्याम माधव धोंड यांच्या अध्यक्षतेत होईल. शिवाय, गझलकट्टा, कविकट्ट्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. या महाराष्ट्रभरातून आलेले सुमारे 900 कवी तीन दिवस कवितेचा जागर करणार आहेत. 3 तारखेला दुपारी 2 वाजता डॉ. सुनंदा गोरे यांच्या अध्यक्षतेत कथाकथन होईल. रंगदृष्टी प्रस्तुत 'गावकथा' हा एकांक, युवक बिरादरीचा 'तीर्थधारा' तसेच, श्याम गुंडावार व श्याम सरोदे यांचा 'अभंगधारा' असे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील संमलेनादरम्यान होणार आहेत.

ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन :ग्रंथप्रदर्शन व वाचन मंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरीत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकुण 290 ग्रंथदालने राहणार आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गोवा येथील राजहंस, मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, मेहता, रोहन, दिलीपराज, साधना इत्यादी प्रकाशनांची पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. याशिवाय, वाचन मंच, बालसाहित्य मंच, बसोली ग्रुप व स्कुल ऑफ स्कॉलर्सतर्फे चित्रकाव्य प्रदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मराठी रसिक, वाचकांना मिळणार आहे.



समारोप उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत : संमेलनाचा समारोप रविवार 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात साहित्‍य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्‍य नगरी सजली आहे.

हेही वाचा : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन

Last Updated : Feb 3, 2023, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details