वर्धा - वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा भागात रात्री 1.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला. देवळी येथून वर्धेकडे येत असलेली एक झायलो कार पुलावरून थेट खाली कोसळली. या उपघातात कारमधील सातही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. हे सातही विद्यार्थी सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील होते. यात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे आमदार विजय रहांगडाळे यांचा मुलगा आविष्कार याचाही समावेश आहे. तर इतर सहा जण वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विविध भागातून आले होते.
महाविद्यालय प्रशासनाने प्रतिक्रिया दिली वाढदिवस बेतला जिवावर -
सात विद्यार्थ्यांपैकी एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व यवतमाळला गेल्याचे समजते. सातपैकी सहा विद्यार्थ्यी महाविद्यालयातील वसतीगृहात राहत होते. तर एक विद्यार्थी बाहेर रहायचा. वसतीगृह प्रशासनाची संमती घेऊन सर्वजण बाहेर गेले. मात्र येण्यास उशीर झाल्याने प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला. शिवाय त्यांच्या आई-वडिलांनाही माहिती देण्यात आली, अशी माहिती दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली.
नियंत्रण सुटल्याने घडला अपघात -
रात्री उशीरा पार्टी संपल्यावर सर्वजण परतण्यास निघाले. दरम्यान देवळी येथून वर्धेकडे येत असताना सेलसुरा भागातील एका पुलावर हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन पुलाच्या मधल्या भागात कार धडकली आणि थेट नदीपात्रत कोसळली. अपघाताची भीषणता अधिक असल्याने कारचे पुर्णत: नुकसान झाले. त्यात सातही जणांचा मृत्यू झाला. यात तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाळे यांच्या मुलाचाही मृत्यू झाला.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक -
महाराष्ट्रातील या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित आहे. या दु:खाच्या प्रसंगी ज्यांनी आपले प्रियजन गमावे आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. तसेच जखमी लवकर बरे व्हावे, असी मी प्रार्थना करतो, असे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच मृतांसाठी 2 लाख रूपयांची मदत घोषित केली.
मृतांची नावे -
- नीरज चौहान, प्रथम वर्ष एमबीबीएस (गोरखपूर, उत्तरप्रदेश)
- नितेश सिंग, इंटर्न एमबीबीएस (ओडिशा)
- विवेक नंदन, अंतिम वर्ष एमबीबीएस (गया, बिहार)
- प्रत्युश सिंग, अंतिम वर्ष एमबीबीएस (गोरखपूर, उत्तरप्रदेश)
- शुभम जयस्वाल, अंतिम वर्ष एमबीबीएस (दीनदयाल उपाध्याय नगर, उत्तरप्रदेश)
- पवन शक्ती, अंतिम वर्ष एमबीबीएस (गया, बिहार)
- अविष्कार रहांगडाळे, एमबीबीएस (गोंदिया, महाराष्ट्र)