महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात उत्तम गलवा कंपनीत अपघात, 35 जण जखमी

वर्धा शहरापासून काही अंतरावर असलेल्या भुगाव येथील उत्तम गलवा मेटॅलिक लिमिटेडच्य ब्लास्ट फरनेसचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना अपघात झाला. यात 35 जण जखमी असून त्यापैकी सहा व्यक्ती गंभीर जखमी आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Feb 3, 2021, 5:23 PM IST

Updated : Feb 3, 2021, 7:37 PM IST

वर्धा- शहरापासून काही अंतरावर असलेल्या भुगाव येथील उत्तम गलवा मेटॅलिक लिमिटेडच्य ब्लास्ट फरनेसचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना अपघात झाला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ब्लास्ट फरनेसचा वॉल्व उघडण्यात आला. यातून निघालेल्या गरम हवा आणि कोळशाचे कण बाहेर पडल्याने अपघात झाला. यात 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरुन आढावा घेताना प्रतिनिधी

वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी फरनेसमधील राख काढताना गरम हवे सोबत राखेचे कण अंगावर उडाल्यामुळे 35 लोक जखमी झालेत. यातील 25 व्यक्तींना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 10 व्यक्तींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. जखमींपैकी सहा व्यक्ती 40 टक्के भाजल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कामगार अधिकाऱ्यामार्फत होणार चौकशी - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करून रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी कामगार अधिकाऱ्यामार्फत केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.

पालकमंत्र्यांनी दिले दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश

या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत कारखाने अधिनियम 1948च्या तरतूदीनुसार तसेच सरकारी कामगार अधिकाऱ्यांमार्फत वेतन प्रदान नियम व कामगार विमा नियमाच्या अनुषंगाने तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करून अपघातास जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.

हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष पटोलेंची मतदानाबाबतची मागणी चुकीची नाहीच - जयंत पाटील

Last Updated : Feb 3, 2021, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details