महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धा : कोरोनाबाधित महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या 23 जणांचा अहवाल निगेटिव्ह, प्रशासनाला दिलासा - वर्धा कोरोना बातमी

10 मे रोजी आर्वीच्या हिवरा तांडा येथे मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यांनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या 28 व्यक्तींचे स्त्राव कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 23 व्यक्तींचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला आहे.

कोरोना बाधित महिलेच्या थेट संपर्कातील 23 जणांचा अहवाल निगेटिव्ह
कोरोना बाधित महिलेच्या थेट संपर्कातील 23 जणांचा अहवाल निगेटिव्ह

By

Published : May 13, 2020, 11:56 AM IST

वर्धा - जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर त्या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या 28 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 23 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून यामुळे सध्यातरी दिलासा मिळाला आहे. मात्र, पुन्हा 14 दिवसानंतर चाचणी होणार असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे.

घरोघरी जाऊन तपासणी करताना वैद्यकीय चमू

10 मे रोजी आर्वीच्या हिवरा तांडा येथे मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यांनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्त्राव कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. तसेच कुटुंबातील 11 व्यक्तींना उपजिल्हा रुग्णालयात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याशिवाय 49 व्यक्तींना हैबतपूर येथील समाजकल्याण वसतीगृहात तर, 24 व्यक्तींना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच कमी संपर्कात आलेल्या 85 व्यक्तींची यादी करून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 28 लोकांचे घशाचे स्त्राव नमुने सोमवारी सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 23 व्यक्तींचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला. या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, या व्यक्तींना पुढील 14 दिवस पूर्ण होईपर्यंत आयसोलेशन आणि क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.

खबरदारी म्हणून हिवरा तांडा गावाच्या 3 किलोमीटर परिसरातील 10 तसेच बफर झोनमध्ये 3 गावांचा समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या 10 गावांमध्ये 25 चमूच्या माध्यमातून प्रत्येक घरी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये पुढील14 दिवसात गावातील सुमारे 8 हजार 25 लोकांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास असलेल्या व्यक्तींना वेगळे काढून त्यांना योग्य उपचार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details