वर्धा - येथील अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कात्री गावात पोलीस कर्मचारी आणि मासेविक्रेत्यांमध्ये वाद झाला. या वादात मासेविक्रेत्यांनी आणि गावकऱ्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच चोप दिला आहे. सचिन सुरकार आणि राजरत्न खडसे, अशी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यावेळी ते दोघेही कर्तव्यावर नसल्याचे बोलले जात आहे.
कात्री येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. यावेळी मासे विक्रेते मासे विक्री संपल्या नंतर हिशोब करतात. यावेळी सचिन सुरकार आणि राजरत्न खडसे यांनी विक्रेत्यांना तुम्ही जुगार खेळत आहेत, असे म्हणत त्यांच्याकडुन पैसे हिसकावले. यावेळी मासेविक्रेत्यांनी त्यांना समजावूनही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी मासे विक्रेत्यास मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी गावकरी देखील हा प्रकार पाहत होते. त्यांनी देखील पोलीस कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांचा आणि मासे विक्रेत्यांचा पारा चढला आणि त्यांनी या पोलीसांना चांगलाच चोप दिला.