तब्बल चार वर्षांनी मिळाले हरवलेले दीड तोळा सोन्याचे सौभाग्याचे लेणं.. वर्ध्यातील घटना
चार वर्षांपूर्वी मुलाला शाळेत सोडून देताना हरवलेले मंगळसूत्र तब्बल चार वर्षानंतर सापडले. यामुळे महिलेला आनंद झाला. मंगळसूत्र हरवलेल्या महिलेच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या महिलेला हा सोन्याचा ऐवज सापडल्याने चार वर्षानंतर तो त्याच्या मूळ मालकाला परत मिळाला. वर्ध्याच्या आदिवासी कॉलनीत हा प्रकार घडला.
वर्धा -चार वर्षांपूर्वी मुलाला शाळेत सोडून देताना हरवलेले मंगळसूत्र ते परत मिळाल्याचा आनंद कोणाला होणार नाही. वर्ध्याच्या आदिवासी कॉलनीत असाच प्रकार घडला अन् चार वर्षांनी उघडकीस आला. चार वर्षांपूर्वी सोन्याचे मंगळसूत्र एकीचे हरवले आणि दुसऱ्या एका महिलेला सापडले. ज्या महिलेला हे सापडले तिनेही प्रामाणिकपणे हक्क न गाजवता लगेच परत देण्यास होकार दिला. या घटनेचीही रामनगर पोलिसांनी नोंद घेतली आणि त्या महिलेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. काय घडले नेमके जाणून घेऊयात..
आदिवासी कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचे साधारण 15 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हरवले आणि ते याच परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेकडे असल्याचा दावा केला. ज्योती पराशे असे मंगळसूत्र हरवलेल्या महिलेचे नाव आहे. चार वर्षापूर्वी ती मुलीला शाळेत सोडण्यासाठी शीतल माता मंदिर परिसरापासून जात असताना मंगळसूत्र पडले. ज्यावेळी त्या महिलेच्या लक्षात आले तेव्हा त्या महिलेने संपूर्ण शोध घेतला पण मंगळसूत्र दिसून आले नाही. अखेर हरवले आणि कधी परत मिळणार नाही, असे समजून ती आता पूर्णतः विसरली. त्यावेळी ना पोलिसात तक्रार केली ना त्याचे बिल होते. यामुळे याचा फारसा गवगवा झाला नाही आणि तेव्हा या मंगळसूत्राची किंमत साधारण 45 हजाराच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.