वर्धा- मासिक धर्म यावर आजही पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. त्यामुळे प्रगत समजत असलो तरी समाज याबाबतीत प्रगत झाला नसल्याचे चित्र आहे. यामुळेच ज्यावर साधे बोलणेही टाळले जाते, त्यावर चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी वर्ध्यातील सेलू येथील महिला डॉक्टर अर्पिता जयस्वाल या प्रयत्न करत आहे. या डॅाक्टर महिलेने चक्क सॅनिटरी पॅडची सव्वा मीटर लांब रांगच तयार केली आहे.
वर्ध्यातील डॉक्टर अर्पिता जयस्वाल या ग्रामीण भागात मासिक धर्माच्या दिवसात स्वच्छता पाळली जावी यासाठी मागील एका वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी महिलांना या दिवसात होणारा त्रास आणि स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वापरण्याचा सल्ला देतात. मात्र, महिला खर्च टाळण्यासाठी घरगुती कापडाचा उपयोग करतात, मात्र यातून होणाऱ्या चुका या महिलांना गंभीर आजाराला सामोरे जात असल्याचे अनेक सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. यावर तोडगा म्हणून जनजागृती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.
यात सॅनिटरी पॅड हा शब्दसुद्धा काढायला कुचंबना होते. अर्पिता यांनी चक्क सॅनिटरी पॅडची सव्वा किलोमीटर रांग तयार करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी सेलू येथील शिवपार्वती मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये हा उपक्रम केला. यात संपूर्ण हॉलमध्ये तब्बल 50 हजारांच्या घरात सॅनिटरी पॅड एका रेषेत ठेवून जागतिक विक्रम करण्यासाठी प्रयत्न केला. यातून त्यांनी 1.230 किलोमीटर रांग तयार करुन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवणाऱ्या संस्थेला नोंद घेण्यासाठी विनंती केली आहे.