महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुलैमध्येच शाळा सुरू करण्याचा सरकारचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - शाळा कधी सुरु होणार

राज्यातील शाळा जुलैमध्ये सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

 उपमुख्यमंत्री
अजित पवार

By

Published : May 30, 2020, 12:14 PM IST

मुंबई -राज्यातील शाळा या जून महिन्यात सुरू केल्या जाणार नाहीत, मात्र जुलै महिन्यात त्या सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यामुळे मागील काही दिवसांपासून १५ जूनला शाळा सुरू होतील, या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यासोबत दूरध्वनीवरून बोलताना ही माहिती दिली. जून महिन्यात शाळा सुरू करणे शक्य नाही. त्यासाठी मी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. मात्र, जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा विचार केला जात असला, तरी त्यावर आम्ही निर्णय घेतला नसल्याने उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शाळा उशीरा सुरू झाल्या तरी जूनमधील दिवस भरून काढण्यासाठी दिवाळी आणि ख्रीसमसच्या सुट्टी काही कमी करता येतील. तसेच पुढील काळात एप्रिल महिन्याच्या काही सुट्ट्या कमी करून अभ्यासक्रम पूर्ण करता येतील, असेही पवार यांनी सांगितले.

शालेय‍ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यात १५ जूनच्या दरम्यान शाळा सुरू करण्यासाठीचा विचार व्यक्त केला होता. त्यावर राज्यभरातून शिक्षक, मुख्या‌द्यापक संघटनांकडून विरोध दर्शविल्यानंतर त्यांनी त्यातून माघार घेत, या शाळा प्रत्यक्षात नाही, तर डिजिटल स्वरूपात सुरू होतील, असे स्पष्ट केले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शाळा जुलैमध्ये सुरू करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केल्याने राज्यातील लाखो पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details