पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतु, याच दहा दिवसांमध्ये शहरातील बाधित रुग्णांची संख्या 6 हजारावर पोहोचली आहे. अवघ्या 10 दिवसांमध्ये तब्बल 6 हजार 138 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. 22 जुलैला 886 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, पहिले पाच दिवस लॉकडाऊनला पिंपरी-चिंचवडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सहाव्या दिवशी नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आणि आकड्यांचा चढता आलेख पाहायला मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 जुलैपासून शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. प्रशासनाने ठरवल्या प्रमाणे पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन लागू राहिले. तेव्हा, नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सहाव्या दिवशी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आणि हजारोच्या संख्येने नागरिक जीवनावश्यक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले. सोशल डिस्टसिंगचा नागरिकांनी अक्षरशः फज्जा उडवला.
एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करायची आहे, असे सांगितलं जातं आहे. तर दुसरीकडे शहरातील बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक आरोग्य, महानगरपालिका प्रशासनाची चिंता वाढत आहे. ज्या उद्देशाने लॉकडाऊन लागू करण्यात आले ते साध्य झाले की नाही, हे सांगणे कठीण आहे. मात्र, शहरातील गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारी 6 हजार पार आहे, हे मात्र नाकारून चालता येत नाही.
लॉकडाऊनमधील दहा दिवसांची आकडेवारी -
- 14 जुलै- 535 जण पॉजिटिव्ह/11 मृत्यू/ 281 डिस्चार्ज/ एकूण संख्य- 8 हजार 171
- 15 जुलै- 432 जण पॉजिटिव्ह/ 15 मृत्यू/ 356 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 8 हजार 603
- 16 जुलै- 501 जण पॉजिटिव्ह/ 17 मृत्यू/ 324 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 9 हजार 104
- 17 जुलै- 676 जण पॉजिटिव्ह/ 06 मृत्यू/ 341 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 9 हजार 790
- 18 जुलै- 656 जण पॉजिटिव्ह/ 15 मृत्यू/ 580 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 10 हजार 446
- 19 जुलै- 592 जण पॉजिटिव्ह/ 17 मृत्यू/ 219 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 11 हजार 38
- 20 जुलै- 643 जण पॉजिटिव्ह/ 12 मृत्यू/ 391 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 11 हजार 681
- 21 जुलै- 540 जण पॉजिटिव्ह/ 20 मृत्यू/ 721 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 12 हजार 221
- 22 जुलै- 886 जण पॉजिटिव्ह/ 15 मृत्यू/ 203 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 13 हजार 107
- 23 जुलै- 677 जण पॉजिटिव्ह/ 21 मृत्यू/ 398 डिस्चार्ज/ एकूण संख्या- 13 हजार 784