मुंबई -कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून राज्यात लॉकडाऊन होते. राज्य सरकारने आता अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अटी आणि शर्तीसह सलून ब्युटी पार्लर सुरू करण्यास 28 जूनला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ग्राहकांना सलूनमध्ये जाण्यापूर्वी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. अशा मार्गदर्शक सूचना मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केल्या आहेत. तसे परिपत्रकही आयुक्तांनी काढले आहे.
लॉकडाऊन असल्याने गेली तीन महिने केस कापणे, दाढी करणे आदी सेवा बंद होत्या. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर सरकारने सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सलून आणि पार्लरच्या ठिकाणी गर्दी आणि कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सलून-ब्युटी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी केवळ केस कापणे, डाईंग, वॅक्सिंगसाठीच परवानगी असेल त्वचेसंदर्भात कोणतीही सेवा दिली जाणार नाही, असे आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
सध्या परवानगी मिळालेल्याच सुविधा मिळतील, अशा ठळक सूचनांचे पत्रक सलून-ब्युटी पार्लरबाहेर लावाव्या लागतील. सेवा देणार्या कर्मचार्यांना हँड ग्लोव्हज्, अॅप्रॉन आणि मास्क वापरणे बंधनकारक असेल. प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर खुर्ची सॅनिटाइझ करावी लागेल. तर दर दोन तासांनी सेवेचे संपूर्ण ठिकाण निर्जंतूक करावं लागेल. तसेच एसी न लावता हवा खेळती राहील याची काळजी घेऊनच सेवा द्यावी लागेल.
31 जुलैपर्यंत या नियमांनुसार काम सुरू राहील, त्यानंतर तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. या काळात नियम मोडून काम करीत असल्याचे आढळल्यास साथरोग कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहेत नियम -
- मुंबई महानगरक्षेत्रात अत्यावश्यक सेवा, कार्यालयीन कामासाठीच प्रवासाची परवानगी.
- सार्वजनिक ठिकाणे, कामाचे ठिकाण आणि प्रवासातही मास्क बंधनकारक. खासगी कार्यालयात १० टक्केच उपस्थिती
- सार्वजनिक ठिकाणी किमान ६ फुटांचे अंतर, दुकानातही सोशल डिस्टंन्स पाळून एकावेळी फक्त पाच व्यक्तींना प्रवेश
- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान, थुंकल्यास कठोर कारवाई
- कंपन्यांनी शक्यतो 'वर्क फ्रॉम होम' सुविधा द्यावी. कार्यालयात एन्ट्री -एक्झिटवर सॅनिटायझर, स्क्रिनिंग सुविधा.
- टॅक्सी, कॅब, रिक्शा, चारचाकीमध्ये ‘ड्रायव्हर प्लस २ पॅसेंजर’ला परवानगी असेल. तर दुचाकीवर डबलसिट घेता येणार नाही.
- गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्त करण्याची सुविधाही अपॉइंटमेंटनेच द्यावी
- वर्तमानपत्र घरपोच मिळणार
- रेस्टॉरंट, किचन होम डिलिव्हरी सुरूच राहणार आहे.