मोदींसारखे खालच्या पातळीवर प्रचार करणारे पंतप्रधान यापूर्वी पाहिले नाहीत - जयंत पाटील - jaynat patil
मोदींसारखे खालच्या पातळीवर प्रचार करणारे पंतप्रधान यापूर्वी पाहिले नाहीत... नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी साधला मोदींवर निशाणा....मुख्यमंत्री खोट्या बातम्या पसरवत असल्याचाही केला आरोप
नाशिक- मला सरकारची कीव येते, की पाच वर्ष सत्तेत राहून त्यांना विरोधी पक्षातील उमेदवारांना उभे करण्याची वेळ आली आहे. आमच्या शक्ती स्थळावर मोदी आणि भाजपकडून हल्ला करण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाहीत, याची काळजी घेणे हे भाजपचे समोर मोठे आव्हान आहे. मोदींच्या चार सभा झाल्या चारही वेळा त्यांनी पवार साहेबांवर टीका केली. मात्र, पवारांवर टीका करणे एका पंतप्रधानांना शोभत नसल्याचा टोलाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
पाटील म्हणाले, पंडित नेहरुंपासून ते अटल बिहारी वाजपेयीं सारख्या अनेक पंतप्रधानांची भाषणे वाचली. मात्र, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे पंतप्रधान पाहिले नाहीत. पवार साहेबांच्या कुटुंबांवर टीका करण्यापासून ते कुणालातरी धमकी देण्यापर्यंत बोलणे हे भारताने पहिल्यांदाच अनुभवले असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मोदींच्या अजून बऱ्याच फेऱ्या व्हायच्या आहेत. त्या आधीच मोदी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचले असतील तर पुढच्या सभेमध्ये ते काय करणार, असा सगळ्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. सरकार सर्व यंत्रणा वापरून त्याचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी मोदी आणि भाजपवर केला. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे, निवडणूक आयोगाने सरकारला समज देण्याची गरज आहे. मात्र तसे काही होताना दिसत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री धमकी थेट वृत्त वाहिन्यांवर मुलाखत देताना रेड टाकून हे सापडले, ते सापडले अशा खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला. भाजपने अशा प्रकारचे उद्योग थांबवले पाहिजेत. आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे. की आयकर विभाग सरकारच्या सुचनांनुसार अशा प्रकारची कारवाई करत आहे. अशा प्रकारच्या कारवाईबाबत आयोगाने दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.