यवतमाळ - लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. त्यामुळे राजकीय नेते जमेल तसे वक्तव्य करत आहेत. अशा वातावरणात भर सभेत बोलताना काँग्रेसच्या एका नेत्याची तर जीभच घसरली. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लिल शब्दात टीका केली. या वक्तव्यानंतर राजकीय वातवरण तापण्याची शक्यता आहे.
हरिभाऊ राठोड असे त्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. ते महाराष्ट्र विधान परिषदचे सदस्य आहेत. रविवारी यवतमाळमध्ये त्यांची जाहीर सभा होती. त्यावेळी सभेमध्ये जनतेला संबोधित करत होते. दरम्यान सरकारच्या पाच वर्षाच्या कामकाजावरून मोदी यांच्यावर टीका करत होते. त्यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्यावतिने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचाही उल्लेख केला.
हरिभाऊ राठोड सभेमध्ये बोलताना या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची एक मुंगीही मेलेली नाही, असा दावा हरिभाऊंनी यावेळी केला. मोदी यांनी या हवाई हल्ल्याचा भावनात्मक खेळ मांडलेला आहे, असा आरोपही त्यांनी बोलताना केला. लोकांच्या भावनेला हात घालून महत्त्वाचे मुद्दे मोदी गहाळ करत आहेत, असेही ते म्हणाले. मात्र, यानंतर भावनेच्या भरात ते स्वतःचे भान विसरले आणि अगदी खालच्या भाषेत मोदी यांच्यावर वक्तव्य केले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये ११ तारखेपासून लोकसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका ४ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहेत. दरम्यान राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होणार आहेत. यामध्येच हरिभाऊ यांच्या वक्तव्यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.