कोल्हापूर-साहेब इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आपण जायला नको असे, डॉक्टरांनी सांगितले. त्यावर, कोरोना झाला तर होऊ दे पण सीपीआरमध्ये काय चालले आहे ते पाहू द्या, असे म्हणत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआर रुग्णालयातील दूधगंगा इमारतीची पाहणी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सीपीआरमधील अधिकाऱ्यांसह डॉक्टर देखील गोंधळून गेले.
कोरोना रूग्णांची सद्यस्थिती आणि नियोजन याबाबत जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. सर्व आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी अचानक कोरोनाबाधित असणाऱ्या दूधगंगा इमारतीला भेट देणार असल्याचे सांगितले. त्यावर डॉक्टरांनी या इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे जायला नको असे सांगितले. त्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोना झाला तर होऊ दे, पण तिथे काय चालल आहे हे मला पाहू द्या, असे उत्तर दिले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी या इमारतीला भेट दिली.
सीपीआरमध्ये येणाऱ्या कोरोना रुग्णांना प्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करा,अशी सूचना यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. केवळ समन्वयाअभावी आरोग्य व्यवस्थेचा लाभ रुग्णांना होत नसल्याची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. अशा कडक सूचना यावेळी त्यांनी दिल्या. सीपीआरमध्ये सध्या 400 बेडची व्यवस्था आहे. त्यामध्ये ऑक्सिजनचे 104 बेड आहेत. 40 ऑक्सिजन बेड नव्याने उपलब्ध करण्यात आले असून येत्या चार दिवसांमध्ये अजून 80 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आपत्कालीन वेळेसाठी रुग्णांसाठी आठ बेड राखीव आहेत. उपचारासाठी येणार्या रुग्णांना रुग्णालयातील राखीव बेडवर दाखल करून तात्काळ उपचार सुरू करावेत, त्यानंतर त्या रुग्णांना उपलब्ध असतील त्या रुग्णालयातील बेड वर शिफ्ट करावे.ही सूचना यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजस्विनी सांगरुळकर उपस्थित होते.