अमरावती -दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून साजरा केला जाणाऱ्या धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा मान आहे. धनत्रयोदशीच्या पर्वावर अमरावतीकरांसाठी मात्र सुवर्ण मिठाई उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील रघुवीर मिठाईच्या वतीने सुवर्ण कलश या नावाने ही स्पेशल सुवर्ण मिठाई बाजारात आणली आहे.
'अशी' बनवली जाते सुवर्ण मिठाई
गत काही वर्षांपासून रघुवीर मिठाईच्या वतीने दिवाळीच्या पर्वावर सोन्याची मिठाई बनविली जाते. कोरोनामुळे गत वर्षी या उपक्रमात खंड पडला असताना या वर्षी मात्र सुवर्ण कलश नावाने रघुवीर मिठाईच्या वतीने सोन्याची मिठाई अमरावतीकरांसाठी तयार करण्यात आली आहे. ही मिठाई बनवण्यासाठी राजस्थानमधून खास कारागीर बोलविण्यात आले होते. ममरा बदाम, पिसोरी पिस्ता, शुद्ध केसर याद्वारे बनविण्यात आली आहे. या मिठाईला 24 कॅरेट सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे. यावर्षी सोन्याचे भाव वाढल्याने या सुवर्ण मिठाईची किंमत 11 हजार रुपये प्रति किलो, अशी आकारण्यात येत आहे. सोन्याची ही एक किलो मिठाई बनविण्यासाठी संपूर्ण दिवस लागला, अशी माहिती रघुवीर मिठाईचे संचालक तेजस पोपट यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.