पणजी - गोवा सरकार येत्या आठ दिवसांत राज्यातील पर्यटन पुन्हा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली.
पर्यटन उद्योग पुन्हा सुरू करावा, अशी छोट्या-मोठ्या हॉटेलवाल्यांची मागणी आहे. सरकार त्याबद्दल सकारात्मक विचार करत आहे. पर्यटन व्यवसायाला दिलासा देण्यासाठी आठ दिवसात निर्णय घेण्यात येईल," असं सावंत म्हणाले.
राज्य सचिवालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की हॉटेलमधील खोल्या स्वच्छ ठेवायला हव्यात आणि सॅनिटाईझ करायला हव्यात. जर हॉटेल सर्व अटींची पुर्तता करण्यास तयार असेल. तर उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पर्यटन गतिविधी पुन्हा सुरू झाल्यावर गोव्याला भेट देणाऱ्यासाठी आवश्यक असणाऱ्या तपासणीचा नियमही चालू ठेवला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने गोवा पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरू करण्यासाठी पुरेसे पाऊल उचलले नाही. तर बेरोजगारी वाढण्याचा इशारा गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनने सावंत यांना गेल्या आठवड्यात पत्राद्वारे दिला होता.