रायगड - अरबी समुदात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळ तयार होणार आहे. हे चक्रीवादळ पश्चिम समुद्र किनारपट्टीवर घोघवणार असून 3 तारखेला रायगडातील हरिहरेश्वरसह संपूर्ण किनारपट्टीला याचा तडाखा बसणार आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेच्या हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली आहे.
कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार असल्याचाही अंदाज बांधला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून समुद्र किनारपट्टीतील गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे सांगितले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील 12 तासात अजून मोठया प्रमाणात पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे चक्रीवादळ होण्याची संभावना हवामान खात्याने वर्तवली आहे. चक्रीवादळ हे उत्तर दिशेला असून ताशी 7 किलोमीटर वेगाने पुढे सरकणार आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडणार आहे. तीन तारखेला हे चक्रीवादळ रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात सायंकाळी अथवा रात्री धडकणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.