मुंबई - पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी पालिकेची कामे वेगाने सुरु आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरीय लोह मार्गांवर रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांतील (कल्व्हर्ट) गाळ काढून साफसफाई केल्याचा दावा पालिकेने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंड दरम्यान रुळाखालील गाळ काढण्यात आला असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील नाल्यांची सफाई; १५ ठिकाणी रुळाखालील कल्व्हर्टमधील काढला गाळ - मध्य रेल्वे मार्ग नाले सफाई न्यूज
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरीय लोह मार्गांवर रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांतील (कल्व्हर्ट) गाळ काढून साफसफाई केल्याचा दावा पालिकेने केला आहे.
नालेसफाई -
दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबईतील नाले सफाई केली जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र थोड्या पावसातच ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडतात. रेल्वे मार्गावरील रुळांमध्येही पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. पालिकेने यंदा शहर, उपनगरांतील १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते मुलुंड दरम्यानच्या १५ ठिकाणच्या कल्व्हर्टमधील पूर्ण गाळ काढून सफाई केल्याचे पालिकेने म्हटले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील नाल्यांमधील गाळ काढून स्वच्छ्ता करण्याची कामे प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका करते. तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छतेची तसेच रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील (कल्व्हर्ट) गाळ काढण्याची कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गांवर येवू नये, यासाठी ही स्वच्छ्ता अतिशय महत्वाची ठरते.
११६ कल्व्हर्ट -
मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ कल्व्हर्ट आहेत. यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावर ४१, मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत. बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छ्ता करणे आव्हानात्मक असते. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोह मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण १८ ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) आहेत. तेथील गाळ काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला विनंती केली होती. त्यानुसार पालिकेने हे काम हाती घेऊन १५ दिवसांत पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली. पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र तैनात करून सदर १८ पैकी १५ ठिकाणी गाळ काढून स्वच्छ्ता पूर्ण करण्यात आली. तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.
येथील कल्व्हर्टमधील गाळ काढला -
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मस्जिद स्थानक दरम्यान कर्नाक बंदराखाली, भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान गोदरेज गॅस कंपनीजवळ, करी रोड ते परळ दरम्यान, परळ ते दादर दरम्यान जगन्नाथ भातमकर पुलाखाली, दादर ते माटुंगा दरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ, माटुंगा ते शीव (सायन) दरम्यान, शीव ते कुर्ला दरम्यान, कुर्ला ते विद्याविहार, कांजूरमार्ग ते भांडुप, भांडुप ते नाहुर दरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नाला आणि मुलुंड ते ठाणे दरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाला.