परभणी -आज (बुधवारी) परभणी शहर आणि पूर्णा येथील दोन कोरोनाबाधित वृद्धांचा मृत्यू झाला. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 16 वर गेली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात परभणी जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 448 झाली असून, त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला, तर 204 जण कोरोनामुक्त झाल्याने उर्वरीत 211 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना संक्रमित कक्षात उपचार घेणाऱ्या 75 वर्षीय वृद्धाचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. ते शहरातील इक्बाल नगर येथील रहिवाशी असून, त्यांना 18 जुलैला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच पूर्णा येथील 61 वर्षीय वृद्धाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते पूर्णा येथील शास्त्रीनगर येथील रहिवाशी असून 17 जुलैला त्यांना परभणीच्या कोरोना संक्रमित कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापुर्वी त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे परभणी जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 16 एवढी झाली आहे.
दरम्यान, काल (मंगळवारी) परभणी तालुक्यातील शहापूरच्या 35 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सदरील रुग्णास किडनी व मनक्याचा क्षयरोग हा आजार होता. ते पुण्यात नियमितपणे डायलेसीसवर उपचार घेत होते. त्यानंतर 12 जुलैला ते परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांना डायलिसिसचा उपचार मिळत नसल्याने त्यांनी एक व्हिडिओ तयार करून त्यात आपली व्यथा मांडली होती. ज्यामध्ये त्यांनी 'आपले काही बरे-वाईट झाल्यास त्याला जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार राहील', असा आरोप केला होता.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात नव्या 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. ज्यामध्ये परभणी शहरातील इक्बाल नगर, टिपू सुलतान चौक, दर्गा रोड, विद्यानगर आणि सद्गगुरु नगर या ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पालम शहरातील अबूबकर कॉलनी, पूर्णा शहरातील कुरेशी मोहल्ला आणि सेलू शहरातील विद्यानगर या ठिकाणीदेखील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. तर गंगाखेड शहरातील हटकर गल्ली येथे 7 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये 10 महिन्याच्या बालकासह 5 व 12 आणि 14 वर्षांच्या लहान मुलींचा देखील समावेश आहे. तसेच यात गंगाखेड शहरातील योगेश्वर कॉलनी येथील दोन पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे.