ठाणे- भरस्त्यात बियरीची बाटली फोडून स्वतःच्या गळ्यावर ४ ते ५ वार करून भोसकून घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरमधील ५ नंबर परिसरातील नेताजी चौक येथील एका बियर बारसमोर घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मधुकर गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मधुकर काही दिवसापूर्वीच अहमदनगर येथून उल्हासनगर शहरातील गणेशनगर भागात राहणाऱ्या आपल्या मित्राकडे कामधंद्याच्या शोधात आला होता. आज(मंगळवार) सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास मृत मधुकर हा नेताजी चौक ५ नंबर परिसरातील डॉयमन बियर शॉप येथे आला. या बारमधून त्याने बियरची बाटली विकत घेतली. त्यानंतर बारसमोरच रस्त्यावर हीच बियरची बाटली फोडून त्या फुटलेल्या काचेच्या तुकड्यांनी स्वतःच्या गळ्यावर ४ ते ५ वार केले. तसेच फुटलेली काचेची बाटली गळ्यातही खुपसली. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात रस्तावर पडला.