ठाणे -ठाण्यातील एका युवाकाने कोरोना काळात आपल्या संकल्पनेतून हजारो रुग्णांना उपचार देण्यासाठी 15 दिवासांत दिल्ली, पुणे, श्रीनगर, पश्चिम बंगाल या ठिकाणी पोर्टेबल रुग्णालये उभारली आहेत. ऑक्सिजन प्लांट उभारण्यात तज्ज्ञ असलेल्या या ठाणेकर तरुणाचे नाव विनोद भट, असे आहे.
पोर्टेबल रुग्णालय ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली -
कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यातच कोरोनाच्या दुसरा लाटेला सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या लाटे सारखीच ही लाट असेल, असा समज सर्वांनीच करून घेतला होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आणि सर्वांचीच मोठे धावपळ सुरू झाली. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे तडफडून मृत्यू झाले. त्यामुळे केंद्र शासनापासून ते राज्य शासनदेखील हवालदिल झाले होते. महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा आणि साठा सुरळीत करण्याकडे व्यवस्था लागली असताना दिल्लीमध्ये मात्र मोठा हाहाकार उडाला होता. कारण दिल्लीमध्ये ऑक्सिजन निर्माण करणारी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नव्हती, अशातच ठाणे शहरातला एक तरुण दिल्लीच्या मदतीला धावला आणि गेल्या दोन महिन्यात दिल्ली, हरियाणा, जम्मू कश्मीर ते आसामपर्यंत या ठाण्यातल्या युवकाने ऑक्सिजन प्लांट निर्माण तर केलेच, पण 'पोर्टेबल' नावाची एक नवीन हॉस्पिटलची संकल्पना सुद्धा प्रत्यक्षात उतरवून दाखवली. अशी पोर्टेबल रुग्णालये उभारताना अनेक सरकारी परवानग्या आणि जागेची आवश्यकता असते म्हणून सरकार पाठीशी असल्यास असे मोठे रुग्णालय तातडीने उभे करता येते, असे विनोद भट यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाची लस घ्या व दाढी मोफत करा; कडा येथील युवकाची अनोखी योजना