नवी मुंबई: कोरोना संसर्ग पसरू नये, त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेतोय. असाच प्रयत्न नवी मुंबईतील सिवूड्स येथे राहणाऱ्या तरुणाने केला आहे. त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करून हात न लावता सॅनिटाईज करणारे ऑटोमॅटिक हॅन्ड वॉश मधीन बनवले आहे. महेंद्र धूरत असे या तरुणाचे नाव असून त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येतेय.
महेंद्र धुरत या तरुणाने अत्यंत मेहनत घेऊन हे मशीन बनवले आहे. सिवूडस पश्चिम येथील सेक्टर 48 ए मधील आदर्श सोसायटीत तो राहतो. लॉकडाऊनमुळे सध्या तो ही घरीच आहे. या फावल्या वेळेत त्याने हे ऑटोमॅटिक हॅन्ड वॉश मशीन बनवले आहे. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे कुठे ही हात न लावता आपण सॅनिटायझरने हात धुऊ शकतो. यासाठी त्याने एकही रुपया खर्च केला नसून टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.
टाकाऊ वस्तूंपासून ऑटोमॅटीक हॅन्ड वॉश मशीनची निर्मिती लोकांना हात धुण्यासाठी त्याने एक बेसिन तयार केले आहे. या बेसीनमध्ये एक नळ असून त्या नळाला सॅनिटायझरची बाटली आणि पाण्याचा छोटा टॅंक पाईपच्या माध्यमातून जोडला आहे. बेसिनच्या खालच्या बाजूला हिरव्या आणि निळ्या रंगाचे दोन पॅडल आहेत. पायाने त्यातील हिरवा पॅडल दाबला की नळातून सॅनिटायझर येते, आणि निळा पॅडल दाबला की नळातून पाणी येते. तसेच वॉश बेसिनच्या वर एक स्क्रीन आहे. या स्क्रीन वर हिरव्या आणि निळ्या अशा दोन रंगांच्या एलईडी लाईट्स लावल्या आहेत. पायाने जो पॅडल आपण दाबू त्या रंगांची लाईट तिथे चमकते. महत्वाचे म्हणजे बाहेरून सोसायटीत येणारा व्यक्ती या माशीनला हात न लावता पॅडलचा वापर करून आपले हात आणि तोंड स्वच्छ धुवून सोसायटीत प्रवेश करू शकतो.
कोरोना संसर्ग आपल्यापर्यंत पोहोचू नये त्यासाठी सोसायटीतील प्रत्येक जण काळजी घेतोय. मात्र काही कामानिमित्त लोकांना सोसायटी बाहेर ये - जा करावी लागते. बाहेरून सोसायटीत येणाऱ्या लोकांसाठी सोसायटीने हात धुण्यासाठी सॅनिटायझर आणि पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र याचा वापर करण्यासाठी लोकांना नळाला आणि सॅनिटायझरच्या बाटलीला सारखा हात लावावा लागत असल्याचे महेंद्र धुरत यांच्या लक्षात आले. अशाने संसर्ग अधिक पसरण्याचा धोका असल्याने त्याजागी वेगळी व्यवस्था करण्याचा विचार धुरत यांच्या डोक्यात आल्याने त्यांनी यावर काम करणे सुरू केले. सोसायटीतील लोकांसाठी हात न लावता वापरता येईल असे ऑटोमॅटिक हॅन्ड वॉश मशीन बनवण्याचा निर्णय धुरत यांनी घेतला. मात्र लॉकडाऊनमुळे त्यासाठी लागणारे सामान दुकानातून आणणे शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर केला. टाकाऊ वस्तू जमवून केवळ दोनच दिवसात धुरत यांनी हे ऑटोमॅटिक हॅन्ड वॉश मशीन तयार केले. हे मशीन बनवण्यासाठी त्यांना एक ही रुपया खर्च आला नाही, हे विशेष.
धुरत यांच्या या प्रयत्नामुळे सोसायटीतील सदस्यांना कुठल्याही वस्तूला हात न लावता सॅनिटायझर ने आपले हात स्वच्छ धुवून सोसायटीमध्ये प्रवेश करता येतो. धुरत यांनी घेतलेल्या या कष्टाचे सर्वत्र कौतुक होतंय. कामानिमित्त सोसायटी मधील लोकांना बाहेर ये - जा करावे लागते. अश्यावेळी नकळत कोरोना संसर्ग घरापर्यंत यायची भीती होती. याच विचारातून हे मशीन आपण बनवले असल्याचे धुरत यांनी सांगितले. खबरदारी घेतली तर संसर्ग रोखता येईल त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे ही धुरत यांनी सांगितले.