ठाणे - एका भामट्याने पैश्यांची गरज असणाऱ्या तरुणाला बँकेतून कमी व्याज दराने कर्ज काढून देतो असे सांगून प्राप्त झालेली कर्जाची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात जमा करून तरुणास २६ लाखांचा गंडा लावून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भामट्याविरोधात नारपोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वैभव मनोहर वारंग( वय ३२ रा.भांडुप पूर्व, मुंबई) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे.
गुगल पेवर आणि चेक घेऊन केली फसवणूक -भिवंडीतील पुरुषोत्तम गजानन सागवेकर (३० रा.कशेळी) या तरुणास पैश्यांची तात्काळ आवश्यकता होती. त्यामुळे त्याने आरोपी वैभवशी संपर्क केला असता कमी व्याज दराने कर्ज काढून देतो असे आरोपीने भासवून विश्वास संपादन केला. त्यानुसार पुरुषोत्तमने १ जानेवारी ते ७ जुलै दरम्यान ऍक्सीस बँक आणि बजाज फायनान्समधून एकूण २६ लाख ८८ हजार ९९९ रुपयांचे कर्ज काढले व कर्जाच्या रक्कमेची परतफेड करण्यासाठी आरोपी वैभवच्या गुगल पेवर १ लाख १२ हजार ८७५ रूपये व ऍक्सीस बँकेचा १३ लाख ५४ हजार ९६० रुपये किंमतीचा चेक त्याला विश्वासाने दिला.