ठाणे -'सीसीटीव्ही कॅमेर्याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे', असे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे युवाध्यक्ष तथा नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी या बंद सीसीटीव्ही कॅमेर्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन केले.
ठाण्यासह मुंब्रा-कौसा-दिव्यातील स्थिती सारखीच
ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने गाजावाजा करत महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते. ठाणे पालिका हद्दीमध्ये प्रभाग सुधारणा निधीतून 1 हजार 200, वायफाय योजनेतून 100 असे एकूण 1 हजार 300 कॅमेरे बसविले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून 100 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, तीनशे ते चारशे कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. या कॅमेर्यांमुळे सोनसाखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसेल, या उद्देशातून महापालिकेने ही योजना राबविली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत लावण्यात आलेल्या कॅमेर्यांपैकी ठाणे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक तर मुंब्रा-कौसा आणि दिव्यातील 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या संदर्भात ठामपाच्या विद्युत विभागाशी संपर्क साधूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) सीसीटीव्ही लावलेल्या खांबांवर चढून 'सीसीटिव्ही कॅमेर्याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे; ठाणे महापालिका सुस्त, ठेकेदार मस्त', असे फलक लावले.