ठाणे- कानात हेडफोन लावून रेल्वे रुळालगत चालणाऱ्या एका तरुणीचा लोकलच्या धकडेत जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या सांगळेवाडी परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली आहे. अंतूदेवी दुबे (28), असे रेल्वे अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - खड्डे नसतानाही नवी मुंबईत खड्डे बुजविण्याचे काम सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अंतूदेवी ही लोकउद्यान गृह संकुलामधील एका इमारतीमध्ये कुटंबासह राहत होती. ती साकेत महाविद्यालयात शिकत होती. ती नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमाराला कॉलेजला जाण्यासाठी कल्याण पश्चिमेकडील सांगळेवाडी मार्गाने कल्याण रेल्वे स्थानकात जात होती. त्यावेळी कानात हेडफोन लावून ती रेल्वे रुळाजवळून चालत होती. त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या लोकलने तिला जोरदार धडक दिली. या लोकलच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला, असे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले.