ठाणे : आर्मी किंवा पोलीसमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाण्यातील एका तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनीष उतेकर ( वय 23 ), असे या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्याच्यावर कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर वाहतूक पोलिसांच्या कथित जाचाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केली. ट्रॅफिक पोलीस त्रास देत असल्याचा मेसेज त्याने आपल्या आईला पाठवला होता. आईला मेसेज पाठवल्यानंतर तरुणाने आत्महत्या केली.
नातेवाईकांचा आरोप:ठाण्यातील वागळे इस्टेटमधील हनुमान नगर येथे मनीष उतेकर हा तरुण आपल्या आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होता. वडील सिक्युरिटी गार्ड तर आई घरकाम करते. मोठा भाऊ हा रुग्णवाहिकेमध्ये चालक म्हणून काम करत आहे. मनीष उत्तेकरने हलाखीच्या परिस्थितीत बारावीपर्यंत शिक्षण केले. त्यांनतर आर्मी किंवा पोलीसमध्ये भरती होण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले होते. मात्र वाहतूक पोलिसांच्या जाचामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मनीषच्या नातेवाईकांना केला.
काय आहे प्रकरण:16 जुलैला ठाणे वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम सुरू होती. त्यावेळी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मनीष उतेकर हा कोपरी येथून आपल्या मित्रांबरोबर घरी जात होता. तेव्हा त्याने मद्यपान केले होते. वाहतूक पोलिसांच्या सुरू असलेल्या मोहिमेत मनिष सापडला. मनीषच्या शरीरात अल्कोहोलचे 176 टक्के प्रमाण आढळले. त्यानंतर मनिष उतेकरवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह' शी संबंधित कलमांतर्गत कारवाई केली. यावेळी मनिषला आपल्या करिअरबाबत भीती वाटू लागली. त्याने पोलिसांना पाया पडून विनंती केली. मात्र तुम्ही उद्या न्यायालयात हजर राहण्यासाठी, या असे पोलिसांनी सांगितले. तेव्हा दुसऱ्या दिवशी मनिष हा वाहतूक पोलिसांना भेटायला गेला. कृपया मला कोर्टात घेऊन जाऊ नका, मी येथेच आपली माफी मागून दंड भरतो असे मनीषने सांगितले. मात्र वाहतूक पोलिसांनी त्याला धमकी दिल्याचा आरोप त्यांने आपल्या मेसेजमध्ये केला आहे. तुझे करिअर बरबाद होईल, अशी भीती मनिषला दाखवली. आपले करिअर खराब होणार असल्याच्या भीतीमुळे मनिषने आत्महत्येचे पाऊल उचलले. दरम्यान मनिषने या घडलेल्या प्रकरणाचा मेसेज आपल्या आईला केला होता. आईला मेसेज केल्यानंतर शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.