ठाणे - मित्राला त्रास का देतोस, असा जाब विचारत एका तरुणावर तलवारीने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हि घटना कल्याणनजीक असलेल्या वडवली गावात घडली आहे. आरोपीने तलवारीने केलेल्या हल्ल्यात तो तरुण बचावला असला तरी घटनास्थळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मित्राला त्रास दिल्याच्या रागातून एकावर तलवारीने हल्ला; तरुण गंभीर जखमी - ठाणे गुन्हे वृत्त
मित्राला त्रास का देतोस, असा जाब विचारत एका तरुणावर पाठलाग करत तलवारीने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कल्याणनजीक असलेल्या वडवली गावात ही घटना घडली आहे.
नयन बाळाराम पाटील (25) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून तो कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील शहाड-आंबिवली स्टेशन दरम्यान असलेल्या वडवली गावातील बाळाराम पाटील निवासमध्ये राहतो. तर हल्लेखोर रवी पाटील (29) हा नयन याचा नात्याने चुलत भाऊ आहे.
आरोपींनी दुचाकीवरून पाठलाग करीत केला तलवारीने हल्ला -
जखमी नयन हा गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घराजवळील नारायण मंदिराच्या समोर चहा पीत उभा होता. इतक्यात तेथे रवी पाटील अवतरला. त्याने शिवीगाळ करत नयनची गचांडी धरली आणि तू विलास भोईर याला त्रास का देतोस, असा जाब विचारू लागला. बाचाबाचीनंतर रवी तेथून निघून गेला. तर नयन हा त्याच्या साहिल पाटील या मित्रासह दुचाकीवरून अमोल कोट नामक मित्राकडे निघाला. हनुमान मंदिराजवळ येताच पाठलाग करत दुचाकीवरून आलेल्या रवी पाटील आणि ऋषिकेश पाटील या दोघांनी नयनची दुचाकी अडवली. तेथे जोरदार हाणामारी झाली. मात्र रवीने सोबत आणलेल्या तलवारीने नयनवर वार केला. नयन कोसळताच रवी आणि ऋषिकेश या दोघांनी तेथून पळ काढला.
नयनला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रवी पाटील आणि ऋषिकेश भोईर यांच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार एस. डी. चौरे करत आहेत.