ठाणे -नौदलात भरती होण्यासाठी जिथे प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येते ते केंद्र नौदलाने रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर बंद केले होते. मात्र, आता नव्याने होणाऱ्या परीक्षेसाठीदेखील याच केंद्राचा पत्ता देण्यात आला आहे. हजारो परीक्षार्थींना याचा फटका बसत आहे. पुन्हा घेण्यात येणाऱ्या परीक्षेविषयी योग्य मार्गदर्शन होत नसल्याने महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यात आलेल्या परीक्षार्थींमध्ये संभ्रम आहे.
ज्युनियर इंजिनियर आणि डेपो मटेरियल सुप्रिटेंडन्ट या पदांसाठी ठाणे परिसरात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आरोपी शिवप्रकाश यादव, गोपीराम सिंग आणि जतीन सागर यांनी परीक्षा केंद्रावर संगणकात फेरफार केली होती. नेव्हीच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी सुद्धा याच सेंटरचा पत्ता परीक्षार्थींना दिला गेला आहे. १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान होत असलेल्या या परीक्षेसाठी विद्यार्थी येत आहे. हे केंद्रच बंद असल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे.