ठाणे- जवळपास दोन वर्षापासून देश कोरोनासारख्या महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असे सर्वच जण जीवाची बाजी लावत कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोना योध्दे म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र त्याचवेळी आरोग्य क्षेत्रातील आणखी एक घटक या महामारीच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आहे. तो म्हणजे औषधाची दुकाने, रुग्णालयात काम करणार फार्मासिस्ट हा घटक होय. कोरोना काळात महत्वाची सर्व औषधांची, इतकेच नव्हे तर कोरोनावरील लशीची निर्मिती करण्यापासून ते औषध दुकानात येणाऱ्यांना औषधे देत रुग्णांचे-नागरिकांचे समुपदेशन करण्यापर्यंत महत्वाचे काम हा घटक करत आहे. आज फार्मासिस्ट डे निमित्त ईटीव्ही भारतचा फार्मासिस्टच्या कामाची दखल घेणारा हा विशेष वृत्तांत
फार्मसी आपल्या आरोग्यासाठी नेहमीच विश्वासहार्य'-
25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. 'फार्मसी आपल्या आरोग्यासाठी नेहमीच विश्वासहार्य' अशी या वर्षीच्या जागतिक फार्मासिस्ट डे थीम आहे. आज देशात सुमारे 15 लाखांहुन अधिक नोंदणीकृत फार्मासिस्ट आहेत. फार्मासिस्ट म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधांचे सेवन करण्यासाठी रुग्णांना काळजीपूर्वक आणि अचूक मार्गदर्शन करणारी व्यक्ती होय. औषध निर्मिती पासून औषधांचे वितरण करणे हे सर्वात महत्वाचे काम आहे. हे काम फार्मासिस्ट करतात. मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळात फार्मासिस्टला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी ही डॉक्टर पोलीस यांच्याबरोबर फार्मासिस्ट यांनीदेखील बजावली आहे. एवढेच नाही तर लॉकडाऊन काळात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेत कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत औषधे पोहोच करण्याचे काम या फार्मासिस्टनी केले आहे.
कोरोना काळात सर्वच फार्मासिस्ट यांच्यावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडला होता. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे औषधांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. रेमडीसिवीर सारख्या औषधांच्या तुटवड्यामुळे काहीवेळा या फार्मासिस्ट लोकांना अडचणींचाही सामना करावा लागला असल्याचे काही फार्मासिस्टकडून अनुभव सांगण्यात आले. मात्र सर्व फार्मासिस्टकडून या कोरोना काळात रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी प्राधान्य देऊन वेळत औषध पुरवठा करण्यामागे मोठी भूमिका पार पाडण्यात आली आहे.
फार्मासिस्टच्या प्रलंबित मागण्याकडे सरकारने लक्ष द्यावे-
आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फार्मासिस्टनां काही वेळा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषता सरकारच्या अनेक सुविधांपासून फार्मसिस्ट हे वंचित असतात, त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यांच्या या मागण्या सरकारने मान्य करून आपत्ती काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या घटकाला दिलासा द्यावा, अशी मागणी आजच्या जागतिक फार्मसिस्ट डे निमित्त काही फार्मासिस्ट संघटनाकडून करण्यात आली आहे.