ठाणे- भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत बिहार राज्यातील मजूर कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे येथील यंत्रमाग उद्योग ठप्प असल्यामुळे भिवंडी शहरात अडकून पडलेले बिहार राज्यातील स्थलांतरित मजूर कामगार हताश झाले होते. अशा १ हजार २०० कामगारांना घेऊन आज एक विशेष ट्रेन बिहारची राजधानी पाटणाच्या दिशेने रवाना झाली आहे.
शहरात अडकून पडलेले स्थलांतरित मजूर कामगार हे ४० दिवसांपासून काम नसल्याने व हाती पैसा नसल्यामुळे हवालदिल झाले होते. त्यांना आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागली होती. परंतु, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरण क्षेत्रामधील भिवंडी रोड रेल्वे स्थानक या ठिकाणाहून परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून ही व्यवस्था केली. या पार्श्वभूमीवर गोरखपूर उत्तर प्रदेश, जयपूर राजस्थान येथील दोन श्रमिक रेल्वे भिवंडीतून प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या. त्यानंतर, आज दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी बिहार येथील पाटणा येथे जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन निघाली होती. या ट्रेनमध्ये १ हजार २०० प्रवाशी स्वार आहेत.