ठाणे -गरज सरो अन् वैद्य मरो या म्हणीचा प्रत्यय ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील परिचारकांना आला आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोना थोपविण्यासाठी ठाणे महापालिकेने हजारो खाटांचे ग्लोबल रुग्णालय उभारले होते. त्या ठिकाणी काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वार्डबॉय व इतर शेकडो जणांची भर्ती केली. मात्र, आता दुसरी लाट ओसरत असताना त्यांना एक मेसेज पाठवून कामावरुन कमी करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आले असून पुन्हा सेवेत सामिल करुन घ्यावे व कोरोनानंतरही शासकीय रुग्णालयात भर्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आम्हाला न्याय मिळावा
कोरोना काळात आम्ही आमच्या व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनाग्रस्तांची सेवा करत होतो. मात्र, अचानक मेसेज करुन कामावरुन कमी करण्यात येत आहे, हे अन्यायकारक असून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी येथील परिचारिकांनी केली आहे.