ठाणे:मिळालेल्या माहितीनुसार, मृतक कामगार कैलास अहिरे हा डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात कुटुंबासह राहत होता. तो गेल्या काही वर्षांपासून शहाड परिसरात बंदरपाडा येथील लाकडाच्या वखारीत कार्यरत होता. त्यातच (आज) शनिवारी सकाळच्या सुमारास कैलास यांनी लाकडाच्या वखारीतच आत्महत्या केल्याची माहिती मालकाने त्यांच्या कुटुंबाला दिली. हे ऐकून अहिरे कुटुंबाला धक्काच बसला होता. विशेष म्हणजे, कैलास यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची सुसाईट नोट लिहून ठेवली होती. यातील माहितीप्रमाणे, गेल्या १६ महिन्यांपासून मालकाने पगार दिला नसल्याने मृत कामगार दुसऱ्याकडून उसने पैसे घेऊन उदर्निवाह करीत होता. त्यामुळे तो कर्जबारी झाला. यासह इतर गोष्टी त्या सुसाईट नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या.
दीड वर्षांपासून घरबंदी:पगार मिळत नसल्याने मृतक कैलास हे गेल्या तीन महिन्यांपासून स्वतःच्या घरीही गेले नव्हते. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांपासून वखारीचा मालक मृत कैलास यांना थकीत पगार देण्याचे केवळ आश्वसन देत असल्याचेही समोर आले. पैसे नसल्याने कुटुंबाकडे कसे जायचे असा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले.
आम्हाला न्याय मिळवून द्यावा:याप्रकरणी आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास खडकपाडा पोलीस ठाण्यात मृतक कैलास यांचा मुलगा यशवंत अहिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला; घरचा कर्ता माणूस मरण पावल्याने दुर्दैवी अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मृतकचा मुलगा यशवंत अहिरे यांनी केली आहे.