ठाणे :महिला सक्षमीकरणाच्या हेतुने ठाणे महापालिका परिवहन सेवेमध्ये महिला प्रवाश्यांसाठी महिला वाहक असलेल्या तेजस्विनी बसेस तीन वर्षापुर्वी दाखल झाल्या. या तेजस्विनी बसेसवर अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्यावतीने तब्बल १२५ महिला वाहक नेमण्यात आल्या. मात्र, तेजस्विनी बसेसवर ८ ते १० तास राबराब राबुनही महिनाकाठी 10,600 रुपयांचे मिळत असल्याने तेजस्विनी महिलांनी टीएमटी सेवेतुन काढता पाय घेतला आहे. त्यामुळे गेले काही महिने तेजस्विनी बसेसचे नियमित संचलन कोलमडुन पडले आहे. त्यातच आता महिला वाहकांऐवजी चक्क कंत्राटी पुरुष वाहक नेमल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात सॅटीस थांब्यावरील टीएमटी वाहतूक निरिक्षकांना विचारले असता, त्यांनी तेजस्विनीच्या सर्व बसेसवर वाहकांची नेमणुक केली जात आहे.
महिला वाहक चालकांना त्रास : टीएमटीच्या तेजस्विनी बसमध्ये शाश्वत रोजगाराच्या आशेने अनेक महिला वाहक भरती झाल्या. परंतु, तीन वर्षे उलटूनही ना वेतनात वाढ झाली, ना टीएमटीमध्ये कायम करण्यात आले. कंत्राटदार महिलेची हस्तक असलेली महिला या नेहमीच अद्वातद्वा बोलून अपमानित करीत असल्याच्या तक्रारी तेजस्विनी वाहक महिलांनी केल्या. कौटुंबिक कारणामुळे एखादीने सुट्टी घेतली तर, त्या वाहक महिलेला स्पेअर ड्युटी किंवा थेट घरी बसवले जाते. स्पेअर ड्युटीमध्ये दिवसभरात आगारात तिष्ठत ठेवून जबाबदारी सोपवली जाते. त्या दिवशी जर बसवर ड्युटी मिळाली नाही तर, महिला वाहकाला त्याचे वेतनही नाकारले जाते. त्यामुळेच अनेक जणींनी तेजस्विनीची सेवा सोडल्याची प्राथमिक माहिती महिला कंडक्टरने दिली.