महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरात घुसून अत्याचार करणाऱ्या नराधमाला विरोध केल्याने विवाहितेची निर्घृण हत्या - Thane

एकटी महिला पाहून घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रकार भिवंडीतील राहनाळ गावात घडला. त्यानंतर त्या व्यक्तीने बळजबरीस विरोध करणाऱ्या महिलेवर हल्ला करीत निघूण हत्या केली आहे. नारपोली पोलिसांनी नराधमास अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

विवाहितेची निर्घृण हत्या

By

Published : Jun 20, 2019, 10:35 PM IST

ठाणे - घरात एकटीच असल्याची संधी साधून 20 वर्षीय नराधम घरात घुसल्याचा प्रकार घडला. त्याने 23 वर्षीय विवाहितेवर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी विवाहितेने जोरदार प्रतिकार केला. यामुळे त्याने तिच्यावर भाजी चिरण्याच्या धारदार चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार भिवंडीतील राहनाळ गावात घडला आहे.

विवाहितेची निर्घृण हत्या

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा व घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल संजय कडू (वय 20) असे नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे, तर चिंतादेवी यादव असे निर्घृणपणे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

मृत विवाहितेचा पती गोदामात कामावर गेला होता. ती काल सायंकाळच्या सुमारास पती कामावरून येण्याची वाट पहात आपल्या 6 महिन्यांच्या बाळासह घरात एकटीच होती. त्यावेळी शेजारी राहणारा नराधम निखिल हा दारूच्या नशेत तिच्या घरात शिरला व तिच्यावर बळजबरीने शरीर सबंध करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी विवाहितेने त्याला जोरदार प्रतिकार केल्याने नराधमाला राग अनावर झाला. त्या रागातून त्याने घरातील भाजी चिरण्याच्या धारदार चाकू हातात घेऊन तिच्या डोक्यात, छातीवर, पाठीमागे असे सपासप वार केले, यातील पाठीमागून केलेला चाकूचा वार थेट फुफ्फुसाला भिडल्याने ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्या नंतर काही वेळाने तिचा पती कामावरून घरी आल्यावर ही धक्कादायक घटना समोर आली.

दरम्यान, या घटनेची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. नारपोली पोलिसांनी आजूबाजूच्या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची हत्या शेजारी राहणाऱ्या निखिल याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्येच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details